जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाचकांशी ज्ञानशलाकाद्वारे थेट संवाद साधावा, यासाठी स्फुरक विचार मांडतो आहे.
विशेष
जागतिक महिलादिनानिमित्त सर्व माता; भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !

महिला केवळ उपभोगाचे साधन नसून त्याहीपलीकडे जी अफाट अध्यात्मिक शक्ती स्त्रीमध्ये आहे त्याजोरावर ती संसाराचा, प्रपंचाचा डोलारा सांभाळते व त्याला संस्काराने अंकित करून जीवनात सुगंध दरवळीते, स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सहनशील असून त्यागीही आहे असे शास्त्रीय विधान सांगते.
स्वयंपाक घराप्रमाणे साधना घरातही अध्यात्मिक चूल पेटवण्याची वेळ आली आहे. टीव्ही, अश्लील पुस्तकाद्वारे पुढची पिढी बिघडत चालली. एकवेळ शाळेतली कविता पाठ नसेल परंतु सिनेमातील नक्कलवारी संगीत मुला-मुलींची तोंडपाठ असतात. मोठ्या वडीलधाऱ्यांकडे कसे वागावे हे त्यांना ठाऊक नाही. स्वतःच्या अहंममध्ये ते सोऽहंला विसरले आहेत त्यांच्यात जागृती करणे हे त्या घरातील कर्तबगार स्त्रीवरही अवलंबून आहे, कारण घराला घरपण देणाऱ्या स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो.
या जन्माचे सार्थक व्हावे याकरिता प्रथम नामस्मरणाचे बीज मनी रुजवावे व कर्मकांडांच्या अग्निहोत्रात सर्व पापांची आहुती द्यावी, कर्तव्याच्या शिखरावर त्यागाचे ध्वजारोहण करावे, या वालुमय शरिरावर श्रद्धेची झाडे लावावी आणि त्यावर येणाऱ्या भक्तीरुपी सुगंधी फुलाफळांचा सुगंधी आस्वाद सर्व पीडीतांना द्यावा, नम्रतेची झोळी घेऊन सर्वांना सहनशीलता वाटावी हा प्रसाद सर्वरोगांवर आत्मबळ घेऊन मात करतो.
लाजऱ्या – बुजऱ्या स्वभावाला निष्ठेची भरभक्कम माती घालून गुरुप्रती समर्पणाचे खत पाणी द्यावे जेणेकरून या डोलणाऱ्या नावेला दिशा, स्थिरता, मार्गदर्शन व ध्येय मिळेल, आणि आपल्या समवेत आपला संसार शांतीच्या किनारी लागू शकेल !